मराठी म्हणी व त्यांचे अर्थ || Best 500+ एकापेक्षा एक म्हणी

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ .. 

मराठी म्हणी || marathi mhani मराठी म्हणी संग्रह व अर्थ


   

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ || मराठी म्हणी संग्रह व अर्थ

अडला हरी गाढवाचे पाय धरी - बुधिमान माणसाला देखील एखाद्या अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

अंथरूण पाहून पाय पसरावे - ऐपतीच्या मानाने खर्च करावा.

अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी दुःखकारक ठरतो.

अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अतिशहाणा मनुष्य वारंवार फसतो.

अगं अगं म्हशी मला कुठे नेशी - काहीतरी पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न करणे.

अति रागा भीक मागा - कोणीही अतिराग करू नये, त्याने मनुष्य भिकेला लागतो.

असतील शिते तर जमतील भूते - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर लोक त्याच्याभोवती जमतात.

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ - अयोग्य माणसाशी संगत केल्याने जिवाला धोका असतो.

अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे - दुस-याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घेऊन सुद्धा आणखीन काही गोष्टींची मागणी करायची.

अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण - मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.


• वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा - अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे, विपत्तीचे दिवस आले की रडणे.

अर्थी दान महापुण्य - संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने मोठे पुण्य लागते.

अर्ध्या वचनात असणे - आज्ञा होईल केव्हा व ती मी पाळीन केव्हा अशा उत्सुकतेने शब्द झेलणे.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोडीशी संपत्ती किंवा गुण प्राप्त झाल्याने गर्व होणे.

अस्मान ठेंगणे होणे -  गर्व होणे, ताठ्याचा कळस होणे.

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन - अपेक्षा धरावी त्याहून जास्त लाभ होणे.

आधी पोटोबा मग विठोबा  - आगोदर पोटपूजा मग देवपूजा, आधी स्वार्थ मग परमार्थ.

आयत्या बिळात नागोबा - एखाद्याने स्वतःसाठी चांगली गोष्ट संपादन करावी आणि दुस-याने त्याचा आयता फायदा घ्यावा.

आपलेच दात, आपलेच ओठ - आपल्याच माणसानी केलेल्या चुकांमुळे निर्माण झालेली अडचणीची परिस्थिती.

आडात नाही तर पोह-यात कोठून येणार? -  न्याय बुद्धीच नाही, तर न्याय कसा मिळेल?

आपला हात जगन्नाथ - आपली इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असता, काही कमी पडत नाही.

आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना - दोन्ही कडून अडचण.

आजा मेला, नातू झाला - घरातील एक माणूस कमी झाले तर दुसरीकडे एक वाढले एकूण सारखेच.

आपले नाक कापून दुस-याला अपशकुन - दुस-याचे वाईट व्हावे म्हणून अगोदर स्वतःचे नुकसान करून घेणे.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - आधीच एखाद्या गोष्टीची हौस आणि त्यात इतरांचे उत्तेजन.

आंधळे दळते कुत्रे पीठ स्वाते - काम करणार एकजण, पण फायदा उठवणार दुसराच.

आले अंगावर घेतले शिंगावर - आयते मिळते त्याचा फायदा करून घेणे.

आधणातले रडतात आणि सुपातले हसतात - दुस-याच्या दुःखाला हसणारे लोक त्याच दुःखाचे धनी होतात.

आईजीच्या जिवावर बाईजी उदार - दुस-यांच्या पैशावर स्वतः चैन करणे.

आपल्या कानी सात बाळ्या - एखाद्या कृत्यात आपले अंग नाही म्हणून अज्ञान दाखविणे.

आपण हसे लोका, शेंबूड आपल्या नाका - ज्या दोषाबद्दल आपण दुस-यांना हसतो, तोच दोष आपल्या अंगी असणे.

आपला तो बाळ्या  दुस-याचे ते कारटे - स्वतः संबंधी जी उदार बुद्धी असते ती दुस-यांच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती.

आगीतून निघून फोपाट्यात पडणे - लहानशा संकटातून निघून मोठ्या संकटात सापडणे.

आकाशपाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करणे.

आठ हात लाकूड व नऊ हात धलपी - अगदी अशक्य अशी गोष्ट सांगणे (कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती करणे).

आंधळ्या गाईत लंगडी गाय शहाणी - अडाणी माणसात थोडासा जाणता असला तरीही तो पंडित म्हणवून घेतो.

आप करे सो काम पदरी होय सो दाम - स्वतःच्या कामावर तसेच स्वतःजवळ असलेल्या पैशावरच फक्त विसंबता येते.

आपल्या पोळीवर तूप ओढणे - दुस-यांचा विचार न करता फक्त स्वतःचाच फायदा पहाणे.

आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे - दुसन्यापासून आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ || मराठी म्हणी संग्रह व अर्थ

इकडचा डोंगर तिकडे करणे - फार मोठे कार्य पार पाढणे.

इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूनी सारख्याच अडचणीत सापडणे.

इळा  मोडून खिळा करणे - अधिक किमतीची वस्तू थोड्याशा लाभाकरिता हातची घालवून देणे.

 इतिश्री करणे - शेवट करणे

उचलली जीभ लावली टाळ्याला - बोलणे सोपे असते, पण करणे कठीण, शक्याशक्यतेचा विचार न करता बोलणे.

उंटवरचा शहाणा- बेजबाबदारपणे व मूर्खपणाचा सल्ला देणारा

उथळ पाण्याला खळखळाट फार - ज्ञान थोडेसे पण त्याचा गाजावाजा मात्र जास्त अस्तो.

उपट सूळ घे खांद्यावर - नसती कटकट मागे लावून घेणे.

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग - अतिशय उतावळेपणामुळे मुर्खासारखे वागणे.

मराठी म्हणी 100

उंदराला मांजर साक्ष - हिताचे संबंध असलेले दोघेही एकमेकांचे साक्षीदार असण्याची परिस्थिती.

उंटावरून शेळ्या हाकणे - अतिशय आळस व निष्काळजीपणा करणे.

उठता लाथ बसता बुक्की - प्रत्येक कामात एक सारखी शिक्षा करीत राहणे.

उधारीचे पोते सव्वा हात रिते - उधार माल घेतल्याने नुकसान जास्त.

उडत्या पाखराची पिसे मोजणारा - फार हुषार मनुष्य.

उंबर फोडून कंबरे काढणे - लहानशा कामाचा अभिमान धरून मोठ्या कामाचा विध्वंस करणे.

उघडा पडणे- निराधार होणे

ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये - चांगल्या गोष्टीचा कधीही गैर फायदा घेऊ नये.

ऊर फाटणे - प्रचंड घाबरणे

ऐकावे जनाचे, करावे मनाचे - लोकांचे मत समजून घ्यावे. पण आपल्याला योग्य वाटेल ते करावे.

एका हाताने टाळी वाजत नाही - घडणा-या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.

एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत - एकाच धंद्याची माणसे एकमेकांचा मत्सर केल्याशिवाय राहात नाहीत.

एक पंथ दो काज - एकाच वाटेवरची दोन कामे एका खेपेत करणेच योग्य.

एक घाव दोन तुकडे - पटकन निकाल लावणे.

एक ना धड भाराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यास त्यातले एक ही काम धड होत नाही. सगळेच अपूर्ण राहते.

एका माळेचे मणी - सगळे सारखेच.

एका कानाने ऐकावे व दुस-या कानाने सोडून द्यावे - एखादी गोष्ट दुस-यांची ऐकावी पण ती मनावर घेऊनये किंवा तसे वर्तन ही करायला जाऊ नये.

एका पायावर तयार असणे - तत्पर असणे, फार उत्कंठित होणे.

ओ म्हणता तो येईना - अक्षरशत्रू असणे.

करावे तसे भरावे - केलेल्या दुष्कृत्यास त्याप्रमाणात शिक्षा भोगण्यास तयार असावे.

कर नाही त्याला डर कशाला ? - ज्याने वाईट काम केले नाही त्याला भीती वाटण्याचे कारण नाही.

कसायाला गाय धारजिणी (धार्जिण) - कठोर व दुष्ट धन्याशी नोकर गरिबीने वागतात, पण गरीब धन्याची मात्र हेळसांड करतात.

कधी तुपाशी, कधी उपाशी - सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते, त्यात चढउतार असतोच.

कवडी कवडी माया जोडी - काटकसरीने पैसा जमविणे.

कंरगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय ? - प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतेच की नाही ?

काखेत कळसा, गावाला वळसा - जवळ असलेल्या वस्तूचा भान नसल्याकारणाने दूरवर जाऊन शोध घेणे.

कामापुरता मामा व ताकापुरती आजीबाई - काम होई पर्यंतच गोड गोड बोलणे.

कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर - ऐकलेली गोष्ट व पाहिलेली गोष्ट यात जमीन आस्मानाचा फरक असू शकतो.

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - वाईट माणसांच्या शापाने चांगल्या माणसांचे काही नुकसान होत नाही.

कानाला वडा लावून घेणे - एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून स्वतःलाच शिक्षा करून घेणे.

काडी चोर तो माडी चोर - लहान सहान अपराध करणा-या माणसाची मोठा अपराध करायचीही प्रवृत्ती होते.

कानावर हात ठेवणे - आपल्याला काहीच माहीत नाही असा भाव व्यक्त करणे.

काट्याचा नायटा (होतो) - एखादी क्षुल्लक गोष्ट म्हणून दुर्लक्ष करू नये ती विकोपाला जाऊन भयंकर परिणाम होऊ शकतात.

कानामागून आली आणि तिखट झाली - मागून येऊन सुद्धा थोड्याच दिवसात वरचढ होणे.

कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच  - जातीस्वभाव वाईट असला तर त्याच्यावर उपदेशाचा परिणाम होत नाही.

कुसंतानापेक्षा निसंतान बरे - कुपुत्र असण्यापेक्षा मुळीच संतान नसलेले अधिक बरे.

कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तू मिळाली तरी तेवढ्यावरच खुष होतात.

कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटावयाचे रहात नाही - जी गोष्ट व्हावयाचीच आहे त्याच्यावर कोणत्याही अडथळ्याचा परिणाम होत नाही.

कोठे राजा भोज आणि कोठे गंगा तेलीण - चांगल्या वस्तू बरोबर क्षुद्र वस्तूची बरोबरी करणे अयोग्य.

कोल्ह्यांना द्राक्षे आंबट - जी गोष्ट अशक्य आहे, त्याची निंदा करणे.

कोणाची होऊ नये बायको, आणि कोणाचे होऊ नये चाकर - दुस-यांच्या तंत्राने चालणा-यांना स्वतंत्रता नसतेच.

खर्‍याला मरण नाही - खरी गोष्ट कधीही कोणीही लपवू शकत नाही. ती कधीतरी उघडकीस येणारच.

खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी - एखाद्या गोष्टीबद्दल आग्रह धरणे.

खाण तशी माती - बीजाप्रमाणे अंकुर असतो, तसेच आई वडिलाप्रमाणे त्यांची मुले असतात.

खाजवून अवधान आणणे - आपल्याच हाताने आपल्या जिवाला त्रास करून घेणे.

खायला काळ भुईला भार - अत्यंत निरुपयोगी मनुष्य कोणालाही नको असतो.

खाऊ जाणे तो पचवू जाणे - जो कोणी वाईट कृत्य करण्यास तयार असतो तो त्याचा परिणामही भोगावयास सिद्ध असतो किंवा जो चांगले काम करण्यास हाती घेतो, तो शेवटही करतो.

खाऊन माजावे, टाकून माजू नये - अन्न खाल्ले तर शरीराच्या वाढीला उपयोग होतो. पण तेच अन्न टाकले तर त्याचा नाश होतो. सत्कार्य करताना त्याचा दुरूपयोग करू नये.

खोट्याच्या कपाळी गोटा किंवा कुन्हाडीचा घाव - जो मनुष्य वाईट काम करतो त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो.

खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे - मनात एक बाहेर दुसरेच रूप. (दुटप्पीपणाने वागणे.)

खाजवून स्वरूज काढणे - मिटलेली भांडणे पुन्हा उकरून काढणे.

गरज सरो वैद्य मरो - गरज असे पर्यंतच एखाद्याची आठवण ठेवणे, गरज संपली की त्याला विसरणे.

गरजवंताला अक्कल नसते - एखाद्या संकटात सापडलेल्या गरजवंताला दुस-यांचे वाईट बोलणेही ऐकून घ्यावे लागते.

गर्जेल तो पडेल काय? (गर्जेल तो वर्षेल काय?) - केवळ बडबड करणा-या माणसाच्या हातून कोणतेही कार्य होऊ शकेल का?

गर्वाचे घर खाली - गर्वाचा किंवा अभिमानाचा अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईटच होतो.

गाढवाला गुळाची चव काय कळणार ? - मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही.

गाढवाने शेत खाल्ल्याचे ना पाप ना पुण्य - दुर्जनावर उपकार केल्याने काही उपयोग होत नाही. आपलेच श्रम व्यर्थ जातात.

गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी - एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग नाही, त्याचा फायदा करून घेण्याचे सामर्थ्य असावे लागते.

गाड्यावर नाव, नावेवर गाडा - सर्व दिवस सारखे नसतात. गरीबाचा श्रीमंत होऊ शकतो व श्रीमंताचा गरीब.

गाढवापुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता - मूर्ख माणसाचे गोंधळ घालण्यात जितके मन रमते तितके चांगल्या गोष्टी ऐकण्यात किंवा करण्यात रमत नाही.

गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य - दोघे दिसायला भिन्न असले तरी वस्तुतः एकच असतात.

गुरूची विद्या गुरूलाच - दुस-यांना फसविण्याचा प्रयत्न केल्यास स्वतः फसल्या शिवाय राहात नाही.

गोगलगाय आणि पोटात पाय - दिसायला गरीब पण असतो कपटी. आत एक आणि बाहेर दुसरेच.

घरोघरी मातीच्या चुली - सामान्यपणे प्रत्येकाच्या घरी सारखीच परिस्थिती असते.

घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून - घर बांधताना किंवा लग्न करताना कोणकोणती संकटे येतील व खर्च किती होईल हे काही सांगता येत नाही. (कोणतीही गोष्ट केल्याखेरीज त्यातील अडचणीची कल्पना येत नाही)

घराची ओज अंगण सांगते - एखाद्याच्या अंगणाची परिस्थिती पाहून त्याच्या घरातील टापटीपपणा समजतो.

घरासारखा पाहुणा होतो, पण पाहुण्यासारखे घर होत नाही - पाहुण्याला घरच्यांच्या चालीरीती स्वीकाराव्या लागतात. घरच्याना पाहुण्याच्या चालीरीती स्वीकाराव्या लागत नाहीत.

घर ना दार देवळी बि-हाड - घरदार, बायको, मुलेबाळे, नसलेला एकुलता एक प्राणी.

चढेल तो पडेल आणि पोहेल तो बुडेल - आपल्या उत्कर्षासाठी धडपड करीत असता कधी अपयश आले तर कमीपणा वाटण्याचे कारण नाही.

चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी अनुकूल परिस्थिती प्राप्त होतेच.

चालत्या गाडीला खीळ घालणे - व्यवस्थित चाललेल्या कामात अडथळा निर्माण करणे.

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ || मराठी म्हणी संग्रह व अर्थ 

चोराच्या मनात चांदणे - जो कोणी दुष्कर्म करतो त्याला ते उघडकीस येईल अशी सारखी भीती वाटत असते.

चोराचे पाऊल चोर जाणे  - चोरांची दुष्कृत्ये चोरानाच माहीत असतात.

चोराच्या वाटा चोराला ठाऊक - चोराचे पाऊल चोर जाणे. चोरांची कृत्ये चोरांसच माहीत असतात.

चोरावर मोर - चोरापासूनच चोरी करणारा सवाई चोर.

चोराच्या हातची लंगोटी - ज्याच्याकडून काहीही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडूनच काही मिळणे म्हणजे सुदैव.

चोराला सोडून संन्याशाला सुळी देणे (फाशी देणे) - ख-या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा करणे.

चोराच्या उलट्या बोंबा - स्वतः गुन्हा करून पुन्हा स्वतःच दुस-यांच्या नावाने आरडा ओरड करणे.

छडी लागे छम्छम् विद्या येई घमघम् - शिक्षा केल्याने मुले अभ्यास करतात अशी जुन्या लोकांची समजून होती.

जगी सर्व सुखी असा कोण आहे ? - आपल्याला सर्व सुखे मिळणे अशक्य, त्यामुळे जे मिळते त्यातच सामाधान मानले पाहिजे.

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी - मुलांचा सांभाळ करणारी माताच जगाचा उद्धार करू शकते.

ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी - आपणावर जो उपकार करतो त्याच्याशी इमानदारीने वागावे, त्याच्याशी बेइमान होऊ नये.

ज्याचे कुडे त्याचे पुढे - दुस-यांचे वाईट करायला जो जातो त्याचेच वाईट होते.

ज्याचे मन त्याला ग्वाही देते - ज्याने पाप केले असेल त्याचेच मन त्याला खात असते.

ज्याच्या मनगटात जोर तो बळी - मनगटाचे बळ पैशाच्या किंवा अधिकाराच्या बळापेक्षा श्रेष्ठ असते.

ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे - भलेपणा सर्वत्र कामाला येत नाही. कोणाचे चांगले केले तर तोच आपल्यावर उलटण्याची शक्यता असते.

जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही - एखाद्याला वाईट सवय लागली तर ती मरे पर्यंत जाणे अशक्य असते.

झाकली मूठ सव्वा लाखाची - आपली परिस्थिती गुप्त असे पर्यंतच आपली प्रतिष्ठा राहते.

टाकीचे घाव सोसल्या विना देवपण येत नाही - कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.

डोळ्यापुढे काजवे दिसणे - खूप भीती वाटणे, त्रास होणे.

डोंगर पोखरून उंदीर काढणे - डोंगरा एवढे (खूप) कष्ट करून लहानसा मोबदला मिळणे.

डोळ्यावर कातडे ओढणे - जाणून बुजून दुर्लक्ष करणे.

ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला - संगतीमुळे चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींचा परिणाम लवकर होतो.

तहान लागल्यावर विहीर खणणे - दूरदृष्टी नसणे, आयत्यावेळी कोणतीही गोष्ट होत नसते.

तळे राखी तो पाणी चाखी - ज्याच्याकडे एखादे काम सोपविले तर तो त्यातून थोडा तरी फायदा करून घेतल्या शिवाय राहत नाही.

ताटावरचे पाटावर, पाटावरचे ताटावर - श्रीमंताच्या बायकांचा डौल व त्यामुळे आळस.

तापल्या तव्यावर भाकरी (पोळी) भाजून घ्यावी - संधीचा लाभ उठविणे.

तीळ खाऊन व्रत मोडणे - एखादा क्षुल्लक फायदा होणार म्हणून अयोग्य काम करणे.

तीर्थी गेल्या वाचून मुंडन होत नाही - काहीतरी कष्ट केल्यावाचून फळ मिळत नाही. श्रम केल्याशिवाय विद्या येत नाही.

तुरूत दान महापुण्य - योग्य वेळी दानधर्म करणे किंवा देवाण घेवाण करणे केव्हाही चांगले. (तुरूत-त्वरीत)

तेल गेले, तूप गेले, हाती राहिले धुपाटणे - स्वताःच्या मुर्खपणामुळे दोन्ही कडून नुकसान होते व हाती काहीच राहत नाही.

तेरड्याचा रंग तीन दिवस - एखाद्या दुष्ट माणसाने चांगुलपणा दाखवला किंवा कोणी पोकळ श्रीमंतीचा भपका दाखवला तर तो फार काळ टिकत नाही.

थोरा घरचे श्वान त्याला सर्व देती मान - मोठ्या माणसांच्या आश्रयाचा प्रभावही मोठा असतो.

read this - समानार्थी शब्द मराठी [ 400+ ] - important samanarthi shabd in marathi

read this- सामान्य ज्ञान (मराठी)

read this- समास मराठी व्याकरण

थेंबे थेंबे तळे साचे - हळूहळू संचय करणे.

दगडावरची रेघ - खात्रीची गोष्ट.

दगडाचा देव होत नाही - अंगी कर्तृत्व नसल्यास मोठेपणा मिळत नाही.

दगडाखाली हात सापडणे - अडचणीत असणे.

दृष्टीआड सृष्टी - आपल्या मागे काय चालले आहे ते दिसत नाही म्हणून दुर्लक्ष करणे.

दांड्याने पाणी तोडले म्हणून निराळे होत नाही - लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी खरे मित्र वेगळे होऊ शकत नाहीत.

दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत - एक गोष्ट अनुकूल असली तर तिचा उपयोग करून घेण्यास आवश्यक असलेली दुसरी गोष्ट नसते.

द्यावे तसे घ्यावे, करावे तसे भोगावे - आपण चांगले काम केल्यास फळ ही चांगले मिळते.

दाम करी काम, बिबी करी सलाम - पैसा आहे तर मान आहे, पैशाने खूपशी कामे पार पाडता येतात.

दिवस बुडाला, मजूर उडाला - दुस-यांच्या कामाबद्दल कळकळ नसली म्हणजे ते काम यशस्वी होऊ शकत नाही (मनापासून काम न करणारा मनुष्य).

दिल में चंगा कथौटी में गंगा - आपले मन निर्मळ असल्यास आपल्या जवळ पवित्र गंगा असल्याप्रमाणेच होय.

दिव्याखाली अंधार - दिवा दुस-याना उजेड देत असला तरी त्याच्याखाली अंधारच असतो, तसेच चांगल्या माणसात सुद्धा एखादा दोष असू शकतो.

दुष्काळात तेरावा महिना - संकटात सापडलेल्या माणसावर आणखीन एका संकटाची भर पडणे.

दुरून डोंगर साजरे - अडचणीची गोष्ट लांबून सोपी वाटते, पण प्रत्यक्ष करायला गेल्यास त्यातील अडचणी कळून येतात.

दुस-याच्या डोळ्यात भसकिनी बोट शिरते - दुस-यांच्या दोषांवर टीका करावयास मनुष्य नेहमी तयार असतो.

दुस-याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही - दुस-यांची क्षुल्लक चूक असली तरी ती दिसते, पण स्वतःच्या अंगी असलेला मोठा दोष दिसत नाही.

दुभत्या गाईच्या लाथा गोड - आपल्याला ज्याच्यापासून फायदा होतो, त्याने आपला कितीही तिरस्कार केला तरी तो मुकाट्याने सोसणे.

दे माय धरणी ठाय - अतिशय त्रास होणे.

देश तसा वेष - परिस्थितीप्रमाणे वागण्यास शिकले पाहिजे.

देह त्यागिता कीर्ती मागे उरावी - एखाद्याचे मरणानंतर देह नष्ट होतो, पण त्याने केलेल्या चांगल्या गोष्टीची मात्र कायम लोकांच्या मनात आठवण राहते.

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी - दोघांच्या आधारावर अवलंबून असणारा माणून नेहमी फसतो.

धर्मावर सोमवार सोडणे - स्वतः काही नुकसान न सोसता परस्पर गोष्टी भागविणे.

धर्म करता कर्म उभे राहते - दुस-यावर उपकार करावयास जाऊन स्वतःवरच संकट ओढवून घेणे.

धन्याला धतुरा आणि चाकरला मलिदा- मालक आहे त्याला कमी प्रतीचे मिल्ने4,पण नोकरास मात्र उत्तम प्राप्त होणे.

नव्याचे नऊ दिवस - नवीन वस्तूचे आकर्षण थोडेच दिवस टिकते. (नव्याची नवलाई)

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने - दोषाने युक्त असलेले काम करीत असता एकामागून एक अशा अनेक संकटाना तोंड द्यावे लागते.

नवरा मरो की नवरी मरो, उपाध्यायाला दक्षिणेशी कारण - पुढे बरे वाईट कोणते ही परिणाम होवोत तुर्त स्वार्थाचाच विचार करावयाचा.

नकटे व्हावे पर धाकटे होऊ नये - लहानाला सर्व सोसावे लागते. व्यंग असले तरी बरे, लहानपण त्याहून वाईट, परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण लाचार होऊ नये.

नाचता येईना अंगण वाकडे - आपल्याला एखादे काम येत नसल्यास स्वतःचा कमीपणा लपविण्यासाठी संबंधीत दुस-या गोष्टीतील दोष दाखविणे.

नाक दाबले म्हणजे तोंड उघडते - एखाद्याला पेचात अडकविल्या शिवाय तो आपले काम करून देणार नाही किंवा आपले म्हणणे कबून करणार नाही.

नाव मोठे लक्षण खोटे - कीर्ती मोठी असली तरी, कृती मात्र नावाला खोटेपणा आणणारी.

नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा - नाव मोठे पण कर्तृत्व मात्र हलक्या दर्जाचे.

न भूतो न भविष्यति - पूर्वी कधी झाली नाही व पुढेही कधी होणार नाही अशी अपूर्व गोष्ट.

नाका पेक्षा मोती जड - एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तुपेक्षा अधिक महत्त्व द्यावयाचे.

पळसाला पाने तीनच - सगळीकडे सारखीच परिस्थिती असते.

पंचप्राणाची आरती ओवाळणे - एखादे काम अगदी मनापासून करणे. (मनांतील सर्व भावनेने आरती ओवाळणे).

पडत्या फळाची आज्ञा - तात्काल मान्यता देणे.

पाचही बोटे सारखी नसतात - कोणतीही एक गोष्ट दुस-या गोष्टी सारखी असू शकत नाही. सर्व माणसे सारख्या स्वभावाची असू शकत नाहीत.

पायातली वहाण पायात बरी - प्रत्येकाला त्याच्या दर्जेप्रमाणेच वागवावे.

पालथ्या घड्यावर पाणी - एखाद्याला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग न होणे.

पिंडी ते ब्रह्मांडी - आपल्यावरून जग ओळवावे.

पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल - जी अशक्य गोष्ट असते ती सुद्धा शक्य होऊ शकते. पुढे तिखट मागे पोचट - आरंभी मोठ्या बढाया मारणारा माणूस मागून कृतीच्या वेळी माघार घेतो.

पुढे पाठ मागे सपाट - पुढचे धडे शिकत असता मागच्या धड्यातील महत्त्वाच्या गोष्टी विसरणे.

पैजेचा विडा उचलणे - प्रतिज्ञा करणे.

पोटात एक ओठात एक - लबाड माणसांचे विचार अनेक असतात. त्यांच्या मनात एक असते व बोलतात दुसरेच.

पोटचे द्यावे पण पाठचे देऊ नये - शरण आलेल्या माणसाला स्वतःचे मूल द्यावे पण भावडे देऊ नये. ज्यावर आपली सत्ता आहे त्याचाच वापर करावा.

पोटात धोंडा उभा राहणे - अतिशय भीती वाटणे.

फासा उलटा पडणे - प्रतिकूल गोष्ट घडणे.

फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याव - राजाने दिलेला न्याय सत्याच्या व प्रजाहिताच्या उलट असला, तरी तो नाइलाज म्हणून पत्करावा लागतो.

फासा सोईचा पडणे - अनुकूल गोष्ट घडणे.

फुले विकली तेथे गोवच्या विकणे - ज्या ठिकाणी मोठ्या प्रतिष्ठेने दिवस घालविले, त्याच ठिकाणी हलकी सलकी कामे करण्याचा प्रसंग येणे.

फूल ना फुलाची पाकळी - जितके आपल्याला द्यायला पाहिजे तितके देणे जमत नसल्यास शक्य आहे तेवढेच देणे.

बळी तो कानपिळी - ज्या मनुष्याच्या अंगी पैशाचे, अधिकाराचे, वशिल्याचे व शक्तीचे बळ असते, तो इतराना छळतो किंवा त्यांच्यावर सत्ता चालवितो.

बसता लाथ उठता बुक्की - नेहमी शिक्षा करीत असणे.

बारा घरचे बारा - भिन्न भिन्न स्थळांचे व भिन्न भिन्न अनुभवाचे लोक काही कार्याकरिता एके ठिकाणी जमतात ते.

बाप तसा बेटा - जे वडिलांच्या अंगी चांगले किंवा वाईट गुण असतील ते मुलाच्या अंगी उतरणे, (वडील तसा मुलगा).

बावळी मुद्रा देवळी निद्रा - एखादा माणूस दिसायला बावळट असला तरी व्यवहारात तो चतुर असतो.

बायकात पुरूष लांबोडा - बायकांच्या घोळक्यात पुरुषानी जाणे योग्य नसते.

बाजारात तुरी भट भटणीला मारी - जी गोष्ट अजून घडायचीच आहे तिच्याबद्दल अगोदरच व्यर्थ वाद घालीत बसणे योग्य नाही.

बाजीरावाचा नातू - मिजासखोर माणूस.

बारा पिंपळावरचा मुंजा - एके ठिकाणी स्थिर न होणारा व सदा हिंडत असणारा माणूस.

बुडत्याला काडीचा आधार - मोठ्या संकटात सापडलेल्या माणसाला वेळप्रसंगी कोणी थोडीशी मदत केली तरी त्याला महत्त्व असते

बैल गेला नि झोपा केला - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.

बैल गाभणा तर म्हणे नववा महिना - एखाद्या माणसाकडून कार्य करवून घ्यायचे असेल तर तो कितीही वेडेपणाचे बोलला तरी त्याला खूष करण्यासाठी 'हो' म्हणावयाचे.

बोलाफुलास गाठ - आपण एखाद्या गोष्टीविषयी बोलत असतानाच ती घडणे. म्हणजेच एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडणे.

बोलाचीच कढी व बोलचाच भात - नुसतीच बडबड. कृती मात्र काहीच नसते.

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले - आपल्या बोलण्याप्रमाणे जो वागतो त्या माणसाला मान दिला पाहिजे.

भरवशाच्या म्हशीस टोणगा - ज्याच्यावर आपण अवलंबून असतो त्याने आयत्या वेळी दगा देणे.

भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी - मागणा-या मनुष्याला एखादी वस्तू दिली तर तो तृप्त न होता जास्तच मागत असतो.

भरल्या गाड्यास सूप जड नाही - एखाद्याच्या अंगावर अनेक कामांचा बोजा असतो. त्याच्या अंगावर आणखीन थोडे काम येऊन पडले तर तो घाबरत नाही.

भाड्याचे घोडे ओझ्याने मेले - स्वतःच्या वस्तूसारखी भाड्याच्या वस्तूची कोणी काळजी घेत नाही.

भांडणाचे तोंड काळे - भांडणाचा परिणाम लाजिरवाणा असतो.

भिंतीना कान असतात - दुस-यानी ऐकण्याची शक्यता असते म्हणून नेहमी सावधगिरीने बोलावे.

भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा - अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्याची माणसाची तयारी असते.

 मरावे परी कीर्ती रूपी उरावे - मनुष्य देहाने मरतो. पण त्याने केलेल्या चांगल्या कामाच्या रूपाने जीवंत राहतो.

मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - दुस-यांच्या मेहरबानीमुळे मिळालेल्या सवलतीचा दुरूपयोग करू नये.

मनी वसे ते स्वप्नी दिसे - एखादी गोष्ट व्हावी असे आपल्या मनाला सारखे वाटत असते. तीच प्रबळ इच्छा आपल्या स्वप्नाच्या रूपाने पूर्ण झालेली असते.

मन राजा मन प्रजा - कोणाचेही बरे वाईट करणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते.

मन चिंती ते वैरी न चिंती - कधी कधी आपल्या मनात जेवढ्या वाईट गोष्टी येतात तेवढ्या शत्रूच्याही मनात येत नसतील.

मनात मांडे पदरात धोंडे - फक्त मनात मोठमोठी मनोराज्ये करायची, पण प्रत्यक्षात मात्र पदरात काही पडत नसते.

मनात एक जनात एक - मनात एक गोष्ट असते, पण बाहेरून निरळीच दाखविली जाते. (दुटप्पीपणा)

मनात पाल चुकचुकणे - शंका येणे, संशय उत्पन्न होणे.

मनाची नाही, पण जनाची तरी ठेवावी - एखादी चूक केल्यावर दुस-यांच्या पुढे त्याची लाज तरी वाटावी.

मान सांगावा जना आणि अपमान सांगावा मना - आपला सन्मान झाला तर तो लोकांना सांगावा, पण अपमान झाला त्याची वाच्यता न करता मनातल्या मनांतच ठेवावा.

मांजराचे पाय कुत्र्यावर करणे - काहीतरी गडबड करून आपली सुटका करून घेणे.

मागून आलेले लोण पुढे पोचविणे - मागून चालत आलेल्या चालीरिती तशाच पुढे चालू ठेवणे.

मानला तर देव नाहीतर धोंडा - एखाद्याचा मान ठेवला तर ठेवला नाहीतर नाही.

म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात - आपलीच माणसे आपल्याला जड वाटत नाहीत.

माळ दुस-यांच्या गळ्यात घालणे - आपले सर्वस्व त्याला अर्पण करणे.

मागुन पुढून बाप नवरा - जे काही येईल ते स्वतःच घ्यायाचे, दुस-याला काही मिळू द्यायचे नाही अशी प्रवृत्ती असणे.

मुंगी होऊन साखर खावी, हत्ती होऊन लाकडे फोडू नये - नम्रपणे वागून आपला फायदा करून घ्यावा, ताठरपणाने वागून दुःख भोगू नये.

मुसळाला अंकुर फुटणे - अशक्य म्हणून मानली गेलेली गोष्ट घडून येणे.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - लहानपणीच मोठेपणीच्या कर्तृत्वासंबंधी किंवा गुणदोषासंबंधी अंदाज लागतो.

यथा राजा तथा प्रजा - अधिकारावरील लोक जसे वागतात, तसेच सामान्य लोकही वागतात.

या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे - काहीतरी लबाडी करून वस्तूचे स्वरूप निरनिराळे करून दुस-याना फसविणे.

या कानाचे त्या कानास न कळू देणे - अतिशय गुप्त ठेवणे.

राजाला दिवाळी काय माहीत - जो मनुष्य नेहमी सुखात असतो त्याला अमकाच एक दिवस आनंदाचा असा नसतोच.

रात्र थोडी सोंगे फार - वेळ अपुरा, पण काम मात्र भरपूर.

रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी - रिकामा उद्योग करीत बसणे.

रोज मरे त्याला कोण रडे - रोजच संकटे येऊ लागली की त्याचे काहीच वाटेनासे होते.

लष्कराच्या भाकरी भाजणारा - निष्कारण दुस-यांच्या उठाठेवी करणारा.

लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. दुस-यांच्या श्रीमंतीचा आपल्याला फायदा नसतो.

लाडे लाडे केले वेडे - मुलाचे फार लाड केले म्हणचे ते वेडे चाळे करू लागते.

लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण - इतरांना उपदेश करायचा, आपण मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.

वडाची साल पिंपळाला लावणे - ख-याचे खोटे व खोट्याचे खरे करून सांगणे.

वराती मागून घोडे - योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.

वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकावरचा राग दुस-यावर काढणे.

वळणाचे पाणी वळणानेच जाणार - निसर्ग नियमाप्रमाणेच सर्व गोष्टी होतात.

वासरात लंगडी गाय शहाणी - अडाणी माणसात थोडासा शिकलेला माणूस ही पंडित म्हणून घेतो.

वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावे - सर्व गोष्टींची संधी आली असता, होईल तो फायदा करून घ्यावा.

वाहिली ती गंगा राहिले ते तीर्थ - पैसे दानधर्म केले तर पुण्यसंचय होईल, तेच आपल्याजवळ राहिले तर आपल्यालाच उपयोगी पडतील.

विंचवाचे बि-हाड पाठीवर - निश्चित निवारा नसणे, थोडासाच संसार नेहमी आपल्या बरोबर बाळगणे.

विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणे - आपल्या मागे मुद्दाम काहीतरी उपद्व्याप किंवा लचांड लावून घेऊन त्रास भोगीत बसणे.

विटले मन आणि फुटले मोती सांधत नाहीत - एखादी वस्तू आपल्याला आवडेनाशी झाली की पुन्हा आवडती होणे शक्य नसते.

शहाण्याला शब्दांचा मार - शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबद्दल शब्दांनी समज दिली तरी पुरेसे असते.

शितावरून भाताची परीक्षा - थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची कल्पना करता येते.

शिकाविलेली बुद्धी आणि बांधलेली शिदोरी फार वेळ पुरत नाही - मनुष्याला उपजत बुद्धीच पाहिजे. दुस-याने दिलेले पुरत नाही.

शिळ्या कढीला ऊत आणणे - जुन्या गोष्टीला नवे स्वरूप देऊन किंवा स्मरणातून गेलेले प्रसंग उकरून काढून, त्याबद्दल वाटाघाटी करणे.

शीर सलामत तर पगड्या पचास - जिवंत राहिलो तर पैसे कसेही मिळविता येतात.

शेरास सव्वाशेर असणे - प्रतिपक्षापेक्षा वरच्या प्रतीचा, एक वस्ताद तर दुसरा त्याहून सरस.

षटकर्णी करणे आणि घोटाळ्यात पडणे - एखाद्या गोष्टीचा गाजावाजा केल्याने कार्यनाश होतो. दोन माणसात एखादी गोष्ट गुप्त राहू शकते, पण तीन माणसात तीच गोष्ट गुप्त राहू शकत नाही.

सरड्याची धाव कुंपणापर्यंत - अल्प बद्धीच्या माणसाच्या कार्याची झेप अल्पच असते.

सरड्याप्रमाणे घटकेत तीन रंग पालटणे - वरचेवर आपले स्वरूप बदलत राहणे.

सगळे मुसळ केरात - महत्त्वाच्या मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे केलेले सर्व काम व्यर्थ होते.

साप म्हणून दोरखंड झोडपणे - (साप साप म्हणून भुई धोपटणे) - एखाद्यावर निष्कारण आळ घेऊन शिक्षा करणे.

सारी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही - सर्व प्रकारच्या स्थितीची जुळवाजुळव करता येते, पण श्रीमंतीची बतावणी करता येत नाही.

सुंभ जळेल पण पीळ जळणार नाही - हट्टी मनुष्याचे हट्टामुळे नुकसान झाले, तरी त्याचा हट्ट नाहीसा होत नाही.

सुताने स्वर्ग गाठणे - क्षुल्लक गोष्टीवरून नको त्या गोष्टींचा उठाठेव करणे.

सोन्याचा धूर निघणे - अतिशय संपत्तीमान होणे.

सोन्याहून पिवळे- फारच उत्तम.

सोनाराने कान टोचणे - तिर्‍हईताने कान उघडणी करणे.

स्वर्ग दोन बोटे उरणे - वैभवाचा कळस झाल्यासारखे वाटून गर्व होणे.

हसतील त्याचे दात दिसतील - लोकांच्या हसण्याची पर्वा न करणे. हात ओला तर मित्र भला - जोपर्यंत मनुष्य दुस-याला काही ना काही देऊ शकतो तोपर्यंत त्याच्याशी सगळे मित्रत्वाने वागतात.

हजीर तो वजीर - जो ऐन वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो.

हत्ती दारात झुलणे - एखाद्याची स्थिती वैभव संपन्न असणे.

हत्ती गेला पण शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि थोडासा भाग व्हायचा राहिला.

हरी जेवण आणि मठी निद्रा - स्वतःचे घरदार सोडून कोठे तरी जेवायचे आणि कोठे तरी झोपायचे.

हां हां म्हणता - अत्यल्प काळात.

ह्या हाताचे याच हातावर करणे - (येथल्या येथेच) वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात.

हातच्या काकणाला आरसा कशाला - जी गोष्ट स्पष्ट किंवा उघड आहे ती दाखविण्यासाठी पुराव्याची जरूरी लागत नाही. 


Follow instagram
Post a Comment

1 Comments